Rohit Pawar And Raj Thackeray: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही तयारीला सुरुवात झाली असून, बारामती येथे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मनसेचे लोकप्रिय नेते वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट राज ठाकरे यांना ऑफर दिली असून, महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे, असे म्हटले आहे.
माझे एकच म्हणणे आहे की संविधान टिकावे असे ज्या पक्षाचे मत आहे, त्या पक्षाने भाजपला सहकार्य करू नये. भाजप ज्या पद्धतीने काम करत आहे, ते संविधानाविरोधात आहे. राज ठाकरे यांना वाटत असेल की, संविधान टिकले पाहिजे तर त्यांनी कुठेतरी विचार करून महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार केला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
खऱ्या अर्थाने आपण कोणत्या बाजूला आहोत ते पाहावे
आपले उमेदवार उभे करून त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होत असेल तर याचा त्यांनी विचार करावा आणि खऱ्या अर्थाने आपण कोणत्या बाजूला आहोत ते पाहावे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी पाहावे की ते मते फोडण्याच्या बाजूने आहेत की संविधानाच्या बाजूने आहेत. ते जर मते फोडण्याच्या बाजूने नसतील तर त्यांनी मविआला ताकद देणे जास्त महत्त्वाचे आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मी केवळ एक आमदार आहे. नागरिक म्हणून माझे एकच म्हणणे आहे की जे पक्ष मते फोडतात. त्यांच्या या कृतीमुळे भाजपला फायदा होतो. असे चित्र आपण याअगोदरही पाहिले आहे. याबाबत त्या-त्या पक्षाने विचार करावा. भाजपला मदत करायची की संविधानाला मदत करायची हे राज ठाकरे यांनी ठरवावे. संविधान टिकवण्यासाठी मदत करायची असेल तर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे, इंडिया आघाडीबरोबर यावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.