आमदार रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस...महाराष्ट्रातील राजकारणात अजितदादांच्या नावाचं वलय सर्व कार्यकर्त्यांना आपलसं वाटणारं आहे. करारी बाणा, कडक शिस्तीचे नेते ज्यांची प्रशासनावर भक्कम पकड आहे. मात्र अजितदादांच्या स्वभावात दोन बाजू आहेत. अजितदादा जसे बाहेर आहेत तसे घरात असतात. अजितदादांची दुसरी बाजू पण आहे. ते खूप हळव्या मनाचे आहेत. ते भावनिक होतात पण दाखवत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्यांच्या जवळचा विषय असेल किंवा काही अडचण असेल तर त्याच्यासमोर भलेही काही बोलतील. पण पाठीमागून संबंधितांना फोन लावून कार्यकर्त्यांचं काम करतात. तसेच कौटुंबिक जीवनातही आमच्याकडून काही चूक झाली तर ते आमच्यावर रागवतात. पण त्यानंतर समजावून सांगतात. मार्गदर्शन करतात. त्यामुळे अजितदादांच्या स्वभावात कडक आणि मवाळ या दोन्ही बाजू पाहायला मिळतात.
अजितदादांसारखा माणूस मुख्यमंत्री व्हावा अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. काका म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून माझीही इच्छा आहे. प्रशासनाच्या मदतीनं आणि इतर मंत्र्यांच्या सहकार्यानं अजितदादांच्या हातून चांगलं काम होऊ शकतं. परंतु स्वप्न आणि विचार एकीकडे असतात. परिस्थितीनुसार घडामोडी घडतात. मुख्यमंत्री कोण होणार हे त्या त्या वेळची परिस्थिती ठरवत असते. परंतु भविष्यात जर परिस्थिती बदलली, अजितदादा मुख्यमंत्री होणार असतील तर ते व्हावं असं मला वाटतं.
सत्तासंघर्षाच्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली होती. अजितदादांनी उचललेल्या पाऊलामुळं पवार कुटुंबही चिंतेत होतं. पण कुटुंब म्हणून आम्हाला अजितदादांबद्दल विश्वास होता. अजितदादा असं काही करणार नाहीत. ते राष्ट्रवादी विचारावर राहतील आणि भविष्यात ते झालेलंही सगळ्यांनी पाहिलं. एका वेगळ्या अर्थानंही अजितदादांवर आमचा विश्वास होता. अजितदादांचे मन आम्हाला माहिती आहे. कुटुंबाचा भाग म्हणून दादांच्या मनात काय चालतंय याचा अंदाज आम्हाला आहे. अजितदादा कुणालाही दुखावणार नाहीत असा भावनिक विश्वास होताच त्यामुळे ते परततील हे वाटतं होतं.
पुणे, बारामती या भागातून थेट अहमदनगर जिल्ह्यात निवडणूक लढवण्याचं मी ठरवलं. कर्जत-जामखेडमध्ये प्रस्थापितांना हरवण्याचं मोठं आव्हान होतं. मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजितदादांकडे गेलो त्यांना मी सांगितले मला निवडणूक लढवायची आहे. तेव्हा अजितदादा म्हणाले की, लोकांवर विश्वास ठेव, जाऊन लढ त्यांना सांग आम्ही तुमच्या बरोबर आहे. काहीही झालं तरी आपण जिंकलचं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि लढूया असा विश्वास आणि कानमंत्र अजितदादांनी मला दिला.
अजितदादांचा स्वभाव पाहिला तर त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. मला एक किस्सा आवर्जुन सांगावा वाटतो, आमच्या लहानपणी काटेवाडीत दिवाळी साजरी करायचो.अजितदादा फटाक्यांच्या शॉपिंगला घेऊन जायचे. तेव्हा आम्ही पोतं भरून फटाके घ्यायचो. लहानपणी दिवाळीत फटाके उडवण्याची वेगळी मज्जा असायची. त्यावेळी दादा आम्हाला जितके फटाके घ्यायचे तितकेच पोतं भरून फटाके शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठीही विकत आणायचे. आम्हाला मिळालं त्याचसोबत सर्वसामान्यांच्या मुलांनाही तितकचं मिळालं पाहिजे ही दादांची भावना होती. दादांनी कधी भेदभाव केला नाही. अजितदादांनी नेहमीच कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं. आपुलकीची भावना अजितदादांच्या मनात असते. बाहेरून कितीही कडक स्वभावाचे दाखवले तरीही हळव्या मनाचे संवेदनशील नेते असा अजितदादांचा स्वभाव आहे.
शब्दांकन – प्रविण मरगळे