Maharashtra Politics: अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे, राज्यातील १ हजार ०७९ ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पक्षाचे अधिक उमेदवार व सरपंच निवडून आल्याचा दावा विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. यातच आगामी महानगरपालिका आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक मोठे विधान केले आहे. शिवसेनेनंतर आता पवार कुटुंबीय अन् राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला येऊन भेटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच केले आहे. यावर बोलताना, प्रत्येक पक्षाकडे आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी एक रणनीती असते. पण शिवसेनेतील फुटीमुळे आम्हाला अजिबात आनंद झालेला नाही. कारण सत्तांतराच्या आणि शिवसेनेतील फुटीच्या या घटनेने राज्याचा विकास आणि धोरणांवर बोलतच नाही. हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक धोकादायक काळ आहे. कुठल्याही स्थितीत सत्ता कशी मिळवता येईल? याचाच विचार होतोय. मग ते साम, दाम, दंड असो की केंद्रीय यंत्रणांचा दबाव, अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.
राजकारणातील घराणेशाहीचे मी समर्थन करत नाही
मी स्वतः पवार घराण्याचा सदस्य आहे. पण राजकारणातील घराणेशाहीचे मी समर्थन करत नाही, असे सांगताना शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्ष नेतृत्वाकडून पक्षातील बंड थोपवण्यात कुठेतरी चूक झाली आहे. बंड थोपवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण त्या ४० बंडखोर आमदारांच्या मनात काय आहे? हे सांगू शकत नाही. ते परत येतील, असा विचार होता. पण बंडाचा हा डाव एक महिना किंवा दोन महिन्यापूर्वीचा नसावा. बंडाचा हा डाव जवळपास एक ते दीड वर्षांपूर्वीचा असावा, असा दावा रोहित पवारांनी केला.
दरम्यान, आमच्या घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असे विरोधकांना वाटते. शिवसेनेनंतर विरोधकांचे पुढचे टार्गेट आम्ही असू शकतो, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"