Maharashtra Politics: दिवाळीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. राज्यातही अनेक ठिकाणी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. बारामतीत गोविंद बागेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातील अनेक कार्यकर्ते येत असतात. यात एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे भावी मुख्यमंत्री अशी इच्छा व्यक्त करणारा बॅनर आणला होता. यावर, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही इच्छा असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असे अनेकांचे मत आहे. तसे माझेही मत आहे. शेवटी आकड्यांचे समीकरण बघावे लागते. येत्या काळात जे काही समीकरण असेल, मित्र पक्षांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. नक्कीच एक ताकदवान व्यक्ती जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसतो, ज्याचा प्रशासनावर वचक असतो, ज्याला काम करण्याची पद्धत माहीत असते तेव्हा अख्ख्या प्रशासनाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा निर्णय पटापटा घेतले जातात तेव्हा त्याचा लोकांना फायदा होतो, असे रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत असेल तर राज्याला फायदा होईल
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल. आघाडीमध्ये असताना मोठे नेते निर्णय घेत असतात. त्यामुळे जो मुख्यमंत्री होईल तो स्वत: निर्णय घेणारा असावा. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होत असेल तर राज्याला फायदा होईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, राज्यातील सत्ताधारी सध्या केवळ मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच राजकारण करत आहेत. त्यांना महापालिकेशिवाय काहीच दिसत नाही, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"