Maharashtra Political Crisis: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपच्या रडावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या विधिमंडळ अधिवेशनात भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यात खळबळ उडवून दिली. यानंतर रोहित पवारांनाही लक्ष्य करण्यात आले. यातच आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील कामानिमित्त आणि विविध योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. यापूर्वीही अशा भेटी घेऊन मतदारसंघातील अनेक कामे रोहित पवार यांनी मार्गी लावली. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीमागे वेगळेच कारण असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
भेटीबाबत काय म्हणाले रोहित पवार?
छत्रपती शिवाजी महाराज आणि देशभरातील ऐतिहासिक गोष्टी या भारताबाहेर आहेत. त्या परत महाराष्ट्रामध्ये कशा आणता येतील यावर चर्चा झाली. शिवाय हा मुद्दा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही महत्त्वाचा वाटला, असे रोहित पवार यांनी या भेटीनंतर सांगितले. रोहित पवार कर्जत-जामखेड विभानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदार संघातील विकास कामाबाबतही चर्चा केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. अन्य कोणत्याही बाबींवर चर्चा झाली नाही, हे रोहित पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, रोहित पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, रोहित पवारांचे काय होणार? याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही, पण भाजप नेते त्याआधीच असे होणार, तसे होणार, अशी वक्तव्ये करत आहेत. ते सांगत असतात की, यांच्या घरावर धाड पडणार, यांचे अमुक होणार, त्यांचे तमुक होणार, आपल्याला कुठूनतरी अधिकृत माहिती मिळाली आहे, असा भास निर्माण करून भाष्य करणारा एक वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. पण यांच्याबद्दल लोकं योग्यवेळी निर्णय घेतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.