Ajit Pawar Vs Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनेक गौप्यस्फोट केले. तसेच अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
८३ वयोमानामुळे कुठेतरी थांबायला पाहिजे, असे मत व्यक्त करताना, कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा अपराध आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांना पाठिंबा दिलेले रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. गेली तीन-चार वर्षे भाजपशी संवाद सुरु होता, असे अजित पवारांनी सांगितले. याचा अर्थ चार वर्षापासून भाजपबरोबर जाण्याचे अनेकांच्या मनात होते. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड आता झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे हे बाहेर जाण्याचे कारण होऊ शकत नाही, असे रोहित पवार म्हणाले.
माझे आई-वडील आणि आजोबाही राजकारणात नव्हते
कधी संधी मिळाली, तर प्रतिभाआजींना हा प्रश्न विचारला पाहिजे, अजित पवार असे बोलले आहेत; तुम्हाला काय वाटते. राहिला प्रश्न कुठे जन्मायचा. तर माझे आई-वडील आणि आजोबाही राजकारणात नव्हते. तर, मी काय करायचे, असा उलटप्रश्न रोहित पवार यांनी केला. ते मुंबई तकशी बोलत होते.
दरम्यान, अजित पवार यांच्यात खूप मोठी क्षमता आहे. पण, भाजपला कधीही लोकनेते चालत नाहीत. एकनाथ शिंदे यांचा एक वर्षात गेम होईल, असे वाटते आहे. भाजपला त्यांच्या पक्षातील आणि बाहेरचेही लोकनेते आवडत नाहीत. ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असतो. त्यामुळे घडत असलेले एक लोकनेता भाजपमुळे संपण्याची भीती वाटते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.