Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एकामागून एक गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. खळबळजनक विधाने नेतेमंडळी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेच्या शपथविधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका विधानावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावर भाष्य करताना शिंदे गटावर टीका केली आहे.
गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यानंतर आता रोहित पवारांनी पाटील यांच्या विधानावर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का?
ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहे. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणे गरजेचे आहे.इतर समाजाचे देखील प्रलंबीत प्रश्न आहे, ते सोडविणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. दुसरीकडे रोहित पवार यांनी औरंगाबादच्या नामांतराचे स्वागत केले आहे.
दरम्यान, भाजपच्या विरोधातील जे जे पक्ष आहे, त्यांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडे आर्थिक ताकद खूप आहे. केंद्रीय संस्था या भाजपच्या इशाऱ्यावर चालतात का, असा प्रश्न जनतेत आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेटीबाबत बोलताना रोहित पवार यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"