मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. आमदारांच्या हॉस्टेल बांधकामासाठी ठाकरे सरकारने टेंडर काढल्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली होती. याला आता प्रतुत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान आणि ननीन संसद भवनाचे काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा आणि केंद्राला लसीकरणाकडे लक्ष देण्यास सांगावे, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. (ncp rohit pawar replied atul bhatkhalkar over pm modi new home and central vista project)
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. आमदारांच्या हॉस्टेल बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसद भवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवारांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना, असा टोला लगावला होता. याला आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही
अतुल भातखळकरजी आपला मुद्दा मला योग्य वाटतो, पण टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही. टेंडर ते कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीतच असेल! आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे. तरीही मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे आश्वासन देत तुम्हीही २२ हजार कोटींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि १३ हजार कोटींचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम पुढं ढकलून लसीकरणाकडं लक्ष देण्यासाठी केंद्राकडं पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल, असा खोचक टोला रोहित पवार यांनी अतुल भातखळकरांना लगावला आहे.
लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी: टास्क फोर्सच्या प्रमुखांचे स्पष्ट मत
एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?
तसेच, सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात! मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?, अशी विचारणाही रोहित पवार यांनी यावेळी केली आहे.