अहमदनगर: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करताना अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. याला भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले. यावर आता पुन्हा रोहित पवारांनी पलटवार केला आहे. त्यामुळे रोहित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगताना दिसत आहे.
जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना रोहित पवार म्हणाले होते की, २०१४ चे खरे मुख्यमंत्री भाजप नेते गोपीनाथ मुंडे होते. आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची पातळी इतकी घसरली नसती. रोहित पवारांना उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी. आधी त्यांच्या घरातील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवावे. उगीच वाद निर्माण करू नये. अजित पवार सांगतात ते रोहित पवारांनी लक्षात घ्यावे, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले होते. यावर आता रोहित पवारांनी ट्विट करत पलटवार केला आहे.
प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये
काही राजकीय नेत्यांचे कर्तृत्व राजकारणाच्या पलीकडे असते. तसेच कर्तृत्व स्व. मुंडे यांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळे स्व. मुंडेंविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचे दरेकर यांनी स्वागत करायला हवे होते. परंतु, तसे न करता उलट त्यांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली. हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे यांच्या निधनानंतर दरेकर भाजपमध्ये आल्याने त्यांना मुंडे साहेब समजले नसावेत. आणि हो. पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचे ठरलेय. त्यामुळे दरेकर यांनी पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केले, याबद्दल आपले आभार, असा टोलाही रोहित पवार यांनी शेवटी लगावला.