NCP Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केली. सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे येणार असून, घड्याळ हे पक्षचिन्हही मिळेल, असा मोठा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. याला शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून ३० सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. तसेच पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला होता. याला आता रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत पलटवार केला आहे.
पक्षाचे चिन्ह असो वा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत
यालाच अहंकार म्हणतात. आम्हाला वाटायचे, भाजप आणि त्यांच्याच नेत्यांना अहंकार आहे. पण, भाजपत गेल्यावर अहंकार येण्यासाठी दोन महिने लागले. निवडणूक आयोग निकाल देईल, तेव्हा देईल. मात्र, निवडणूक आयोग आपलेच ऐकतात, असे भाजप नेते सांगतात. म्हणून पटेलांना अहंकार आलेला दिसत आहे. पक्षाचे चिन्ह असो किंवा नसो आमच्याकडे शरद पवार आहेत, या शब्दांत रोहित पवारांनी निशाणा साधला.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पूर्वीच हे स्व:घोषित निर्णय देत आहेत. याच्यातून समजून घ्यायचे की निवडणूक आयोग कदाचित भाजपचे ऐकत आहे. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यावर घड्याळाकडे नव्हे, तर शरद पवारांकडे जनतेने पाहिले होते. पक्षाचे चिन्ह असो किंवा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत. स्वार्थी राजकारण आम्हाला जमणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.