Rohit Pawar : "काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:09 AM2023-07-10T10:09:18+5:302023-07-10T11:14:35+5:30

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

NCP Rohit Pawar Share emotional post Over maharashtra political crisis | Rohit Pawar : "काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले...

Rohit Pawar : "काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले...

googlenewsNext

अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला आमदार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानं शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्हावर कब्जा करण्यासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांना आपल्याकडे वळवण्याबरोबरच पक्षाचं नाव आणि चिन्ह राखण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर कब्जा करण्यासाठी मजबूत दावेदारी केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी याच दरम्यान आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ते घरी गेल्यावर मुलांसमवेत असताना घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.  "काय अडचण झाली डॅडा?" मुलाने प्रश्न विचारला. आता या लहान पोराला सांगावं तरी काय, असा प्रश्न पडला होता. आपण लहान आहेत असं म्हणतो, पण ते खरंच किती मोठे असतात ना… अडचणीच्या काळात जवळची माणसं जेव्हा आधार बनतात तो आधार खरंच डोंगराएवढा मोठा असतो" असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

रोहित पवारांची ट्विटर पोस्ट

"सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ४-५ दिवस घरीच जाता आलं नाही.. काल येवल्याची सभा आटोपून आज घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग तुमच्याशी मुद्दाम शेअर करतोय… नेहमीप्रमाणे आज सकाळी घरी गेल्या गेल्या मुलं धावतच जवळ आली… मला घट्ट पकडलं… मलाही त्यांच्या त्या स्पर्शाचं समाधान नेहमीपेक्षा अधिकच वाटलं.. त्यांना जवळ घेऊन बोलत असताना मुलाने प्रश्न केला… डॅडा ५ दिवस झालेय कित्ती वाट पाहतोय तुझी.. कुठं गेला होता? (ते दोघंही मला कधी अरेतुरे तर कधी अहोजाहो बोलतात. त्यांच्यासोबतची जवळीक अधिक वाढावी आणि नातं अधिक घट्ट रहावं, म्हणून मलाही तसंच आवडतं.)"
 
"त्याच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं.. बाहेर होतो बाळा….अडचण होती जरा…
 ‘‘काय अडचण झाली डॅडा?’’ त्याचा पुढचा प्रश्न.
मी - ‘‘आपल्या संघटनेत जरा अडचण आली होती.”
तो - ‘‘काय अडचण आली होती?’’
निरागसपणे एकामागून एक असे अनेक प्रश्न विचारणं त्याचं चालूच होतं.
आता या लहान पोराला सांगावं तरी काय, असा प्रश्न पडला होता. दुसरं काहीतरी बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करत होतो. कारण घरी येताना राजकारण घरात घेऊन यायचं नाही आणि बाहेर राजकारण करत असताना मध्ये घर आणायचं नाही, हा माझा मूळ स्वभाव. पण आजचा प्रसंग मात्र माझ्यासाठी अत्यंत वेगळा होता. "

"मी त्याला म्हणालो, ‘‘अरे बाळा काही नाही, ज्या पक्ष संघटनेत मी काम करतो ना ती संघटना आज अडचणीत आहे. त्यातच संघटना आणि आपल्या कुटुंबात अंतर पडतं की काय असं वाटतंय.. काही आपल्याच जवळची माणसं……
माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. मी गप्प झालो.
तेवढयात तो म्हणाला, बोल ना डॅडा!
त्याच्या बोलण्याने पुन्हा भानावर येत कसंतरी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलत असताना मनावर अत्यंत तणाव होता.. बोलताना शब्द जड होत होते.. नेहमीसारखी सहजता नव्हती.. संघटनेतील ज्या गोष्टीमुळं पाच-सहा दिवसांपासून अत्यंत अस्वस्थ होतो, ती गोष्ट काही क्षणापुरती विसरुन मुलांना बोलावं, त्यांनी कसा अभ्यास केला? काय ॲक्टिीव्हिटी केली? हे विचारावं असं वाटंत होतं. पण जणूकाय मूळ विषय माझी पाठ सोडतच नव्हता."

"मुलाच्या या प्रश्नांनी मी निरुत्तर होत होतो..… या चिमुकल्या वयात त्याला काय आणि कसं उत्तर द्यावं, असा गोंधळ माझ्या मनात सुरु होता.
तेवढ्यात मुलीने प्रश्न विचारायला सुरवात केली.… 
ती म्हणाली…. मग आता काय होईल डॅडा? तू कॉफी घेतली का? असे एका दमात तीने दोन प्रश्न विचारले. 
काही नाही बेटा सगळं ठीक होईल. आपल कुटुंब जपणं, सर्वांनी गुण्यागोविंदाने, सामंजस्याने, आनंदाने एकत्र राहणं ही आपली संस्कृती आहे… पण त्याबरोबर आपले विचार जपणं हेही तेवढंच गरजेचं असतं आणि हे विचार जपणारी माणसं आहेत आपल्या सोबत….
तिला माझं हे बोलणं कितपत कळलं की नाही माहीत नाही…
पण तिने होकारार्थी मान हलवली.. आणि माझा हात स्वतःच्या चिमुकल्या हातात घेतला आणि दुसरा हात माझ्या तोंडावरुन फिरवत म्हणाली, ‘‘नो टेंशन डॅडा.. काळजी करु नको.. मॉम, आजोबा, आजी हे आम्ही पण सगळेजण आहोत ना सोबत..’’"

"तिचे हे शब्द कानावर पडताच मनात विचार आला…
ज्यांना आपण लहान आहेत असं म्हणतो, पण ते खरंच किती मोठे असतात ना… अडचणीच्या काळात जवळची माणसं जेंव्हा आधार बनतात तो आधार खरंच डोंगराएवढा मोठा असतो...
शेवटी कर्तव्याची जाणीव असलेला बाप म्हणून त्या दोघांनाही थोडा वेळ मॉलमध्ये घेऊन गेलो… पण यानिमित्ताने त्यांच्यासोबत घालवलेला वेळ मात्र त्यांच्यापेक्षा मलाच खूप काही देऊन गेला…" असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: NCP Rohit Pawar Share emotional post Over maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.