Bageshwar Baba: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बागेश्वर बाबाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल एक विधान केले असून, यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही बागेश्वर बाबाने केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला असून, राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत, अशी टीका केली आहे.
धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केला आहे. यानंतर आता धीरेंद्र कृष्ण यांच्यावर टीका होत आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत बागेश्वर बाबावर निशाणा साधला.
तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!
बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्य प्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेले महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
बागेश्वर बाबाने नेमके काय म्हटलेय?
संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. कुणीतरी त्यांना विचारले की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवावर प्रेम केले नसते, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की, माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा, असे बागेश्वर बाबा म्हणत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
दरम्यान, बागेश्वर धाम तथा पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. ज्यातून संत तुकाराम आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यामधून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो, की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागावी, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"