Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी इशारा दिल्यानंतर नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळे वळण देण्याचे काम केले जात आहे. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा शरद पवारांनी दिला. यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजप नेते कुठं आहेत?
'कन्नड रक्षण वेदिके'चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठे आहेत? निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतेय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतेय. संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणे हा कसला संवाद? राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळे महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढे न झुकणारा महाराष्ट्र यापुढे शांत बसणार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी दर्पोक्ती २०२१ मध्ये करणाऱ्या ठाकरेंचा सूर सत्तेवर येताच बदलला आणि नाकर्तेपणाची जाणीव झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी वादग्रस्त भाग केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न करून पाहिला. मुख्यमंत्री असूनही कोणतीच जबाबदारी न घेता, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या असे जनतेला सांगणाऱ्या ठाकरे यांनी सीमावादातून पळ काढला होता, आणि आता सत्ता, पक्ष काहीच हाती नसताना पुन्हा तोंड उघडले आहे. सत्ताभ्रष्ट झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच असे प्रकार घडतात. सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला? अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"