मुंबई - भाजपाने काढलेल्या मोर्च्यात बोलताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात बॅनरबाजी करून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) केलेल्या वादग्रस्त टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. "गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी "भाजपा नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत पाटील दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे" असंही म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजपा नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत पाटील दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा! पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.,
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. "कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या" असे म्हणाले होते. याला आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
"वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या"
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा, वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या" असं दीपाली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर पुण्यातही रुपाली पाटील यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. तर सदानंद सुळे यांनी सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यायवर ट्विट केले आहे.