अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला आमदार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटानं शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्हावर कब्जा करण्यासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. आमदारांना आपल्याकडे वळवण्याबरोबरच पक्षाचं नाव आणि चिन्ह राखण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून पक्ष आणि चिन्हावर कब्जा करण्यासाठी मजबूत दावेदारी केली जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी याच दरम्यान भाजपाला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. "ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना…" असं म्हणत निशाणा साधल आहे. तसेच " आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल" असंही म्हटलं आहे.
"लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते… जसं राजकारणासाठी भाजपाने चुकीचा मार्ग निवडलाय... आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल…" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यात, राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांपैकी बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात सगभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे शरद पवारांच्या गटात आहेत. रोहित पवार सातत्याने विचारसरणीचा मुद्दा उपस्थित करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत.