राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी भाजपाचे नेते राम शिंदे (BJP Ram Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू?” असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राम शिंदेंनी केलेल्या दाव्यावर रोहित पवारांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले” असं राम शिंदे म्हणाल्याचं रोहित पवार यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावरून नंतर सणसणीत टोला देखील त्यांनी शिंदेंना लगावला आहे.
"खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत"
“ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकिन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू? राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू” असं आव्हान रोहित पवारांनी दिलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"