उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. असं असतानाच आता जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
रोहित पवार यांनी या अशा घटनांवरून राज्यातील सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हे सगळं पाहिल्यावर ‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आलीय..." असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पाहावं लागणार आहे?" असा खोचक सवाल देखील विचारला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांनी याबाबत ट्विट करून टीकास्त्र सोडलं आहे. "गुंडच सरकारसोबत फोटोसेशन करतात, मंत्रालयात रिल्स बनवतात, भाजपाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळ्या घालतात आणि आता भाजपाच्या नगरसेवकावर गोळ्या झाडल्या… हे सगळं पाहिल्यावर ‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आलीय..गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पाहावं लागणार आहे?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार
चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केला. यात ते जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. महेंद्र मोरे हे हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असताना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.