Rohit Pawar : "सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं दोघांनी"; रोहित पवारांनी शेअर केला 'तो' Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:58 PM2023-07-24T12:58:28+5:302023-07-24T13:07:46+5:30
NCP Rohit Pawar : जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या जाहिरातींमधून वगळण्यात आलं आहे.
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांशी फारकत घेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत या नेत्यांनी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. अजित पवारांच्या या भूमिकेने राष्ट्रवादीत २ गट पडले. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेला संघर्ष आपल्यासमोरही उभा राहू शकतो त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी आणि विकासकामांसाठी सत्तेत सहभागी होण्याचे वेध शरद पवारांसोबत राहिलेल्या आमदारांना लागले आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान राज्यातील सरकारला एक खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच "सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी!" असं म्हटलं आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडीओ काल रात्री काढलेला असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला जाहिरातीचा डिजिटल बोर्ड पाहायला मिळत आहे. यावर राज्य सरकारच्या जाहिरात दाखवण्यात येत आहेत.
काल रात्री काढलेला हा व्हिडिओ!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 24, 2023
सरकार चालवायचं तिघांनी
जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी! pic.twitter.com/66teOqvA7f
आपला दवाखाना या सरकारी उपक्रमासह इतरही अनेक जाहिराती या बोर्डवर पाहायला मिळत आहेत. मात्र या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या जाहिरातींमधून वगळण्यात आलं आहे. त्यामुळेच आता रोहित पवार यांनी "सरकार चालवायचं तिघांनी, जाहिरातीत मिरवायचं मात्र दोघांनी!" असं ट्वीट केलं आहे.
रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यासारखे नेते शरद पवारांसोबत आहेत. मात्र अजित पवार आणि इतर राष्ट्रवादी नेते नसल्याने राज्यात पक्ष संघटनेला उभारी देण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण पुन्हा सगळे एकत्र आले पाहिजे. पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहिला पाहिजे असं या आमदारांना वाटते. परंतु जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासारखे आमदार शरद पवारांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे अशी भूमिका मांडत आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.