सध्या देशाचं इंग्रजीतील नाव बदलून भारत करण्याच्या मुद्द्यावरून जोरदार घमासान सुरू आहे. अनेकजण इंडियाचं नामकरण भारत करण्याच्या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत. तर काही जण विरोध करत आहेत. जी-२० देशांच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांना राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. केंद्र सरकार विशेष अधिवेशनामध्ये विधेयक संमत करून घेत घटनेमधून इंडिया हा शब्द हटवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एका देशाचं नाव बदलण्यासाठी देशाचे किती पैसे खर्च होतील, असा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीने यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
"नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे असं ही म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर गरिबीला श्रीमंती, बेरोजगार युवकाला नोकरीवाला, महागाईला स्वस्त, भ्रष्टाचाराला सुशासन, खराब रस्त्यांना चकाचक रस्ते, आत्महत्येला इच्छामरण, हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं."
"देशाच्या मुलभूत समस्या सोडवण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी भावनिक राजकारण करायचे आणि देशाचे मूळ मुद्दे चर्चेतून बाजूला सारायचे हाच एकमेव अजेंडा हे सरकार चालवत आहे. त्यामुळे महागाई ,बेरोजगारी, शिक्षण, दुष्काळ या विषयांना प्राधान्य द्यावे की नाव बदलण्याच्या चर्चेला प्राधान्य द्यावं, हे आता जनतेनेच ठरवायला हवं. मीडिया व सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी मूळ मुद्द्यांना बाजूला सारण्याचा सरकारच्या या जाळ्यात न अडकता मूळ मुद्द्यांवरच चर्चा करायला हवी ही विनंती" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जगात सध्या १९५ हून अधिक देश आहेत. त्यामधील अनेक देशांनी कुठल्या ना कुठल्या कारणाने आपलं नाव बदललेलं आहे. त्यामुळे आपलं नाव बदलणारा भारत हा पहिला देश नसेल. मात्र केवळ नाव बदलल्याने बोलण्या लिहिण्यापुरतं नाव बदलणार नाही. तर कागदपत्रे, संकेतस्थळे, लष्करी गणवेश एवढंच नाही तर लायसन्स प्लेटवरही हा बदल दिसणार आहे. हे सर्व बऱ्यापैकी खर्चिक असू शकतं. देशाचं नाव बदलण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचा अंदाज घेण्यासाठी कुठलाही फिक्स फॉर्म्युला नाही आहे.