Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रात तापलेले राजकीय वातावरण अद्यापही शमताना दिसत नाही. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही यासंदर्भात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सातत्याने या मुद्द्यावरून शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधत असून, याप्रकरणी जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जनआक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
शिवसेने नेत आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील वडगावमध्ये ‘जनआक्रोश’ मोर्चा काढत वेदान्ता फॉक्सकॉनवरून शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीचे सरकार असते. तर राज्यात वेदांन्ताचा प्रकल्प काहीही करून आणलाच असता. त्यामुळे इथे आक्रोश मोर्चाच्या जागी जल्लोष मोर्चा झाला असता, असा दावा आदित्य ठाकरेंनी बोलताना केला होता. यावर रोहित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आदित्य ठाकरेंना समर्थन दिले.
आदित्य ठाकरे वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत
खरे तर आदित्य ठाकरे हे लोकांत जाऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे वेदांताबाबत हे केवळ बोलत नाहीत, ते पुरावेही देत आहेत. ते पुरावे बघितल्यानंतर असे दिसते आहे की, राज्यातल्या बऱ्याच कंपन्या गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत. योगायोग म्हणजे, डिसेंबर महिन्यात गुजरातची निवडणूक आहे, त्यानंतर कर्नाटकची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लोकांच्या हितासाठी सुरू आहे की राजकारणासाठी, असा प्रश्न पडतो. जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचे राजकारण आहे की, दुसऱ्या राज्याच्या हिताचे राजकारण, हे बघितले पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे.ठाकरे पितापुत्रांना महाराष्ट्राची माहिती नाही. वाटाघाटींच्या नावाखाली वेगळ्याच हालचालींचा सुगावा लागल्यामुळेच फॉक्सकॉनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, असा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला होता.