मुंबई: काँग्रेस नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना आसाम पोलिसांनी एका प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, दुसऱ्या एका प्रकरणात जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, भाजपवर टीका करण्यात येत आहे. यातच आता नवनीत राणा यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुंबई पोलिसांनी थेट एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोलखोल केली आहे. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जिग्नेश मेवाणी अटकेवरून भाजपवर मोठा आरोप केला आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. या आरोपाला मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ट्वीट करून उत्तर दिले आहे. यावर, रोहित पवार यांनीही ट्वीट करून यासंबंधी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांचा दाखल देत राणा यांना टोला लगावला आहे.
जिग्नेश मेवाणींना भाजपवाले जाणीवपूर्वक त्रास देतायत
नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका करताना, रोहित पवार यांनी जिग्नेश मेवाणी यांचा दाखला दिला आहे. गुजरातमधील काँग्रेस जिग्नेश मेवाणी आमदार यांना एकामागोमाग एक गुन्ह्यात अटक करून भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडे जातीचं बोगस नाही तर अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी त्यांनी ना जातीचं हत्यार बाहेर काढलं ना वॉशरुमला जाऊ न दिल्याची तक्रार केली. विचारधारेशी तडजोड नाही!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, आमदार जिग्नेश मेवाणी यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली. पुन्हा अटक केल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांना कोक्राझार जिल्ह्यातून बारपेटा येथे नेण्यात येत आहे. आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या ट्विट प्रकरणी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर केला. कोक्राझार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भावना काकोटी यांनी त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे.