ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनं (Zomato) केवळ दहा मिनिटांमध्ये डिलिव्हरी देण्याची सुविधा सुरू केली आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल (Deepinder Goyal) यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, कंपनी यासाठी कोणत्याही आपल्या डिलिव्हरी भागीदारांवर कोणताही दबाव टाकणार नसल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं. आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून ही सेवा पुरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ" असल्याचं म्हटलं आहे. "डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"आज ग्राहकांना त्यांच्या गरजांची जलद उत्तरं हवी आहेत. त्यांना ना योजना करायची आहे ना वाट पाहायची आहे. खरं तर, कमी वेळात फूड डिलिव्हरी करणाऱ्या रेस्तराँचा शोध घेणं हे झोमॅटो एपवरील सर्वाधिक वापराचं फीचर आहे," असं गोयल यांनी म्हटलं आहे. मला असं वाटू लागलंय की झोमॅटोचा फूड डिलिव्हरीचा 30 मिनिटांचा सरासरी वेळ हा अतिशय संथ आहे आणि लवकरच तो बदलला जाईल. जर आम्ही हे केलं नाही, तर आणखी कोणीतरी हे काम करेल. इनोव्हेशन करत राहणं आणि पुढे जाणं हेच टेक इंडस्ट्रीत टिकून राहण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच आम्ही कंपनीच्या 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी ऑफरला Zomato Instant असं नाव दिल्याचं गोयल यांनी सांगितलं.
अधिक मागणी असलेल्या ग्राहकांच्या जवळच अशा फिनिशिंग स्टेशन्सच्या नेटवर्कवर डिलिव्हरी अवलंबून असते. डिश लेव्हल डिमांड प्रोडक्शन अल्गोरिदम आणि इन स्टेशन रोबोटिक्सवरदेखील कंपनी अधिक अवलंबून असेल. डिलिव्हरी पार्टनरद्वारे निवडल्यानंतर अन्न ताजं आणि गरम असल्याची खात्री करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. हायपरलोकल स्तरावर प्रोडक्शनमुळे किंमत खुपच कमी होईल याची आम्हाला आम्हाला खात्री आहे. तर आमच्या रेस्तराँ भागीदारांसोबतच आमच्या वितरण भागीदारांसाठीही पूर्णरित्या मार्जिन आणि उत्पन्न समान राहणार असल्याचं गोयल यांनी सांगिलं. 1 एप्रिलपासून गुरूग्राममधील चार ठिकाणांपासून ही सेवा सुरू केली जाईल.