मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. विनायक मेटे मराठी समाजाचे मोठे नेते होते, तसेच त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकारही घेतला होता. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाला मोठी हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, आता त्यांच्या पत्नीला राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने केली आहे. यानंतर आता "विनायक मेटेंच्या पत्नीला मंत्रिपद द्या" अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ज्योती मेटे यांना "महिला व बालकल्याण मंत्रालय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन त्यांना न्याय द्यावा" अशी मागणी केली आहे. " महायुतीने स्व. मेटे यांच्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना महिला व बालकल्याण मंत्री व बीड जिल्हयाचे पालकमंत्री पद देऊन त्यांना न्याय द्यावा. लोकनेते स्व. मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतील महायुती २०१४ साली महाराष्ट्रात सत्तेत आली. स्व. विनायक राव मेटे यांनी २०१४ पासून महायुतीला सहकार्य केले. आ.मेटे यांच्या निधनाने शिवसंग्राम परिवार कोलमडला आहे."
"महायुतीने स्व.मेटे यांच्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन महिला व बालकल्याण मंत्रालय व बीड जिल्हयाचे पालकमंत्री पद देऊन त्यांना न्याय द्यावा. एक महिला कार्यकर्ता म्हणून ही माझी मागणी आहे. ज्योतीताई मेटे यांना प्रशासकीय अनुभव आहे. त्याचा फायदा बीडसह महाराष्ट्रभरात होईल याची मला खात्री आहे" असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. 'डॉ.ज्योती मेटे यांना भारतीय जनता पक्षाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे,' असे ट्विट काकडे यांनी केले आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे, त्यामुळे त्यांनी भाजपकडे अशाप्रकारची मागणी केली आहे.