मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी केलेल्या एक ट्विटमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार" असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. कंबोज यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपा नेत्यांनी देखील त्याचं समर्थन केलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (NCP Rupali Patil) यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. "दरवेळी कोणतरी नेता उठतो आणि म्हणतो, हा नेता आत जाणार, याच्यावर कारवाई होणार. याला कोणताही कायदेशीर थारा नाही. भाजपाच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल, तुमच्या काळात दिली गेली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणे हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का?" असा सवाल पाटील यांनी केला आहे.
"जेलमध्ये जायला कोणी घाबरत नाही. मात्र तुम्ही पारंपरिकतेला छेद देत आहात. विरोधकांवर खोटे आरोप करायचे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर असे ट्विट सोडून विरोधकांना धाकात ठेवायचे, असा जो प्रकार मोहित कंबोज करत आहे, त्याला आमचा ठाम विरोध आहे. एखादा परप्रांतीय तो जेथून आला आहे, तेथे जाऊन या यंत्रणांचा गैरवापर करून तिथल्या सत्तेवर वजन दाखवावं" असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय"
शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. "किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. भास्कर जाधव यांनी "भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचा मराठी लोकांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप करता करता, ईडीची चौकशी लावता लावता स्टॉक आता संपला आहे. म्हणून त्यांनी मोहित कंबोज नावाच्या एका नव्या, दुसऱ्या माणसाला समोर आणलं आहे. जो काही अत्याचार होतोय, अन्याय होतोय, ईडीची कारवाई सर्वांवर होतेय हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रची जनता पाहतेय. योग्य वेळी महाराष्ट्राची जनता यांना उत्तर देईल" अशा शब्दांत निशाणा साधला आहे.