Maharashtra Politics: काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत पक्षात मोठी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थ खात्याचा कार्यभारही अजित पवारांकडे देण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. यातच आता अजित पवार गटातील एका बड्या नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार यांना योग्यवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, असे प्रतिपादन रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केले. तसेच शरद पवार यांनी देशात, राज्यात विकासाचे राजकारण केले व तेच कार्यकर्त्यांना शिकवले. भविष्यातील विकासासाठी आम्हाला युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा क्लेशदायक निर्णय घ्यावा लागला. १९९९ साली शरद पवार यांना पंतप्रधान करावे या भूमिकेतून त्यांच्या सोबत गेलो. आजपर्यंत त्यांना साथ दिली, असे रामराजे निंबाळकर यांनी नमूद केले.
अजितदादांना साथ देत राहणार आहे
भविष्यात पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय असेल, असे मला वाटत नाही. राज्याचा विकास सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहे. तो आम्ही करत राहू. त्याच पद्धतीने अजितदादांना साथ देत राहणार आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी आम्ही आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन रामराजे निंबाळकर यांनी केले.
दरम्यान, कमी पर्जन्यमान असलेल्या माण- खटाव तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे तालुके टंचाईग्रस्त घोषित करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी रामराजे यांच्याकडे केली. आपण महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणात जावे, अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवली.