Sharad Pawar: साहेबांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार होईल, त्याच्या पाठिशी आपण उभं राहू; अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 03:45 PM2023-05-02T15:45:36+5:302023-05-02T15:50:12+5:30
'आज ना उद्या हा निर्णय होणार होता. कोणीही अध्यक्ष झाला तरी, पक्ष साहेबांच्याच जीवावर चालणार आहे.'
Sharad Pawar News: आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि देशातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावूक झाले.
'साहेब तुम्ही नसाल तर आम्ही कुणाकडे जायचं...', जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर
दरम्यान, यावेळी अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे सर्व नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली तर अजित पवार यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. 'सगळ्यांच्या भावना ऐकल्या, मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत, म्हणजे पक्षात नाही असं नाही. कॉंग्रेस पक्षाबाबत आपण पाहत आहोत, खर्गे अध्यक्ष असतील तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात. साहेब नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार झालेला तुम्हाला मान्य नाही का?'
साहेबांच्या निर्णयाची आम्हालाही माहिती नव्हती, आम्हालाही मोठा धक्का- प्रफुल पटेल
'एखाद्या व्यक्तीचे वय झाले की, नवीन लोकांना संधी दिली जाते. कोणीही अध्यक्ष झाला तरी, पक्ष साहेबांच्याच जीवावर चालणार आहे. तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. साहेबांनी एक आवाहन केले आहे, पक्षाची कमिटी पुढचा निर्णय घेईल. ही कमिटी एकंदरीत लोकांचा आलेला कौल लक्षात घेईल. या कमिटीनेच पुढच्या गोष्टी ठरव्यात. ते जे ठरवतील ते साहेबांना मान्य आहे. कमिटी म्हणजे कुठली बाहेरची लोकं नाहीत. या कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातीलच लोकं असतील. मी असेल सुप्रिया असेल आणि इतर सर्वजण असतील. कमिटी तुमच्या मनातला योग्य निर्णय घेईल, ऐवढी खात्री मी तुम्हाला देतो', असंही अजित पवार यावेली म्हणाले.
"पवार साहेब राजीनामा मागे घ्या"; कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती, काही जण रडले, काही पाया पडले!
आज ना उद्या हा निर्णय होणार होता. आज घेतलेला निर्णय कालच होणार होता, मात्र काल 1 मे आणि वज्रमूठ सभा असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आता तुम्ही भावनिक होऊन आमच्याकडे पर्याय नाही असं म्हणू नका. साहेबांनी फक्त पक्षाचा राजीनामा दिला आहे, ते पुर्वीसारखं सगळीकडे फिरताना दिसणार आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष तयार होणार आहे. नवीन अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्या गोष्टी शिकत जाईल. साहेबांच्या डोळ्या देखत नवं नेतृत्व तयार झालं तर तुम्हाला का नको रे? नवीन अध्यक्ष झाल्यावर साहेब त्याला राजकारणातले बारकावे सांगतील. आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू,' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.