NCP Sharad Pawar Group News: संविधानावर आधारित लोकशाही विषयीची चिंता मागील १० वर्षांत वाटू लागली आहे. राज्यांबद्दल मोदी सरकारची भूमिका असहकार्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेत भ्रष्टाचार केला असा आरोप केंद्र सरकारने केला. हा भ्रष्टाचार उघडकीस आणून कारवाई करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले.
महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ज्याप्रमाणे शेतात वाढलेले तण उपटून फेकतो तसे हे सरकार उखडून टाकावे लागेल.देशात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून पाहात नाही. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.
माईक हातात मिळाला की नेहरुंवर टीका करतात
केंद्र सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या आणि ते म्हणतात की ही 'मोदी की गॅरंटी' आहे परंतु त्यांच्या गॅरंटी कार्डावर तारीख नाही. त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याबद्दल घृणा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जवाहरलाल नेहरू यांनी देशात संसदीय लोकशाही मजबूत केली, जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली, संपूर्ण जग हे मान्य करत आहे. पण मोदी मान्य करत नाहीत. माईक हातात मिळाला की नेहरुंवर टीका करतात, या शब्दांत शरद पवारांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, मोदी सरकारने शेतकरी, तरुण महिला अशा सर्वांना फसवले. या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. २०२४ हे वर्ष अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. दक्षिण भारतातून भाजपाला दारे बंद झाली आहेत, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये राजद पक्ष आधीपासूनच इंडिया आघाडीत आहे. महाराष्ट्रात संविधानाची मोडतोड करुन खोके सरकार आणले आहे, हे जनतेला आवडलेला नाही. देशातील ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींसाठी व भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.