“युपीए सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी केली, भाजपाला शेतकऱ्यांबद्दल अनास्था”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 01:18 PM2024-03-14T13:18:29+5:302024-03-14T13:19:13+5:30

NCP Sharad Pawar News: शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा, असे आवाहन भारत जोडो न्याय यात्रेत करण्यात आले.

ncp sharad pawar criticized bjp central govt over farmers issues in bharat jodo nyay yatra in maharashtra | “युपीए सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी केली, भाजपाला शेतकऱ्यांबद्दल अनास्था”: शरद पवार

“युपीए सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी केली, भाजपाला शेतकऱ्यांबद्दल अनास्था”: शरद पवार

NCP Sharad Pawar News: द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केला.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. 

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा

२०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती. पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. 

भारत जोडो न्याय यात्रेमुळे एक गॅरंटी पक्की, ती म्हणजे...

भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्याची, जनतेची बात ऐकत आहेत पण काही लोक फक्त मन की बातच करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. भाजपाच्या राज्यात आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला होता पण आज भाजपा राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे ‘मोदी तो गयो’ असे म्हणत मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असे स्पष्ट केले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिलीच्या सीमेवर व रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. हमी भावाचा कायदा करावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे पण मोदी सरकार त्यांची दखल घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरकारचे व आपले दरवाजे सदैव शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुले असतील व इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले. 
 

Web Title: ncp sharad pawar criticized bjp central govt over farmers issues in bharat jodo nyay yatra in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.