Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे भाजपा, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. सध्याच्या मोदी सरकार विरोधात शेतकरी व सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड रोष आहे, असा दावा शरद पवार यांनी केला. दौंड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
२०१४ ला मोदी यांनी राज्य हातात घेतले आणि तेव्हा त्यांनी जाहीर केले, ५० दिवसांच्या आत पेट्रोलचा भाव मी ५० टक्के कमी करतो. त्यांची घोषणा होऊन ३ हजार ६५० दिवस झाले. त्याचा हिशोब केला. २०१४ ला ७१ रुपये लिटर भाव होता, ५० टक्के कमी करतो म्हटले म्हणजे ३५ रुपये किमान व्हायला हवा होता. पण आता तो भाव १०० ते १०६ रुपये आहे. याचा अर्थ एकच आहे शब्द दिला एक आणि केले दुसरे. आया बहिणी आमचे घर सांभाळतात. त्यांना गॅस लागतो. मध्यंतरी सर्वत्र जाहिराती होत्या, गॅसचे भाव कमी केले. २०१४ ला घरगुती गॅसच्या एका सिलेंडरचा दर ४१० रुपये होता, आज १ हजार १६० आहे. भाव कमी झाला? असा थेट सवाल शरद पवारांनी केला.
मला माझ्या बोटाची चिंता वाटू लागली आहे
पंतप्रधान मोदी बारामतीला आले तेव्हा माध्यमांना म्हणाले होते की, शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो. आता मला माझ्या बोटाची चिंता वाटू लागली आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर आणि रामटेक या ठिकाणी सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावरून सुनावत, पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१४ मधील आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.
दरम्यान, विरोधकांकडे सांगण्यासारखे दुसरे काही नाही. गेल्यावेळी आघाडी नव्हती आता आघाडी आहे. एक एक जागा निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी काम करत आहे. मोदींची एक एक जागा कमी करणे, मोदींची संसदेतील संख्या कमी करणे, त्यांची शक्ती कमी करणे ही देशाची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले होते.