मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्हावरही दावा सांगितल्याने हे प्रकरण निवडणूक आयोगात पोहोचले असून सध्या सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यानही दोन्ही गटातील संघर्ष पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप करत निवडणूक आयोगात आपली सरशी होण्यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या वकिलांना फटकारत 'एक्स'वर लिहिलं आहे की, "५३ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर २०१९ साली अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासूनच पक्षात वाद होता, असा दावा अजित पवारांच्या वकिलाने केला. मात्र त्यांना हे माहीत नसावं की, आमदारांच्या सह्यांचं ते पत्र चोरण्यात आलं होतं आणि त्यामुळेच अजित पवारांना ७२ तासांत राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदाचे फायदे भोगले," असा घणाघात आव्हाड यांनी केला आहे.
"अजित पवार गटाच्या वकिलांच्या बोलण्यात सतत विरोधाभास जाणवत आहे. एकीकडे ते म्हणतात की शरद पवारांबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही आणि दुसरीकडे त्यांनीच शरद पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक बेकायदा असल्याचं सांगत पवार यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पक्षाचे मालक असल्याप्रमाणे शरद पवारांची वागणूक होती, असं त्यांनी लिहलं आहे," असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड Vs अजित पवार, वाद आता व्यक्तिगत पातळीवरही...
राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटाचे नेते आमने-सामने आल्याने आता व्यक्तिगत टीकाही होऊ लागली आहे. अजित पवार यांनी आपल्या गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता त्यांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली होती. याला उत्तर देत आव्हाड यांनीही अजित पवार यांचा एक फोटो शेअर करत टोला लगावला आहे. तसंच "दादा तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत बोलला नसतात तर मी तर आपल्याविरोधात एक शब्दही काढला नव्हता. मग माझ्यावर दरवेळी टीका कशासाठी?" असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.