NCP Rohit Pawar ED Raid ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांना सक्तवसुली संचालनालय अर्था ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीकडून रोहित पवार यांना २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांबाबत शंका असल्याने ईडीने रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांमागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीशी संबंधित विविध ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. आता पुन्हा ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावलं असल्याने रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
साखर कारखान्याशी संबंधित प्रकरण काय आहे?
कन्नड सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला. ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केली, असा आरोप आहे. लिलावातील सहभागी बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यांमध्ये एकमेकांत झालेले व्यवहार संशयास्पद असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच आता रोहित पवार यांना चौकशीचा सामना करावा लागणार आहे.
राजकीय आकसातून चौकशी होत असल्याचा आरोप
अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले. आम्ही सत्तेत सहभागी होण्यास नकार दिल्यानेच तपास यंत्रणांच्या माध्यमातून आम्हाला लक्ष्य केलं जातं असल्याचा आरोप याआधीच रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखीनच धार येण्याची शक्यता आहे.