NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाने दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता शरद पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह घड्याळ आणि पक्ष हे दोन्ही काढून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले. असाच प्रकार शिवसेनेच्या बाबतीत झाला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला. इतकी वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र, अशा पद्धतीने वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला. ही एका अर्थाने लोकशाहीची हत्या आहे.
हे अतिशय दुर्दैवी आहे
सर्वोच्च न्यायालयाने चंदीगड महापौर निवडणुकीच्या बाबतीत सुनावणी घेताना म्हटले होते की, आम्ही उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाची ही ताजी प्रतिक्रिया असताना राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात तेच घडले. हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शरद पवार गटाला आता पक्षाचे नवीन नाव आणि नवीन चिन्हाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे.