“अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 02:11 PM2024-02-07T14:11:56+5:302024-02-07T14:15:25+5:30
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत, असा दावा केला जात आहे.
NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. यासंदर्भात अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात एक कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. यातच अजित पवार गटात बहुतेक जण नाराज आहेत. लवकरच अनेक नेत्यांची घरवापसी होईल, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते अनिल देशमुख यांनी याबाबत दावा केला आहे. मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी हवा असतो. पैसे हवे असतात. त्यामुळे अनेक आमदार महायुतीत सहभागी झाले. निवडणुका जवळ आल्यावर बहुसंख्य आमदारांची एकेक करून घरवापसी सुरू होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर हे आमदार शरद पवार यांच्याकडे परत येतील. अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत. आगामी काळात निवडणुकांच्या आधी फुटलेले आमदार परत येतील, असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे.
भाजपा आमदारांमध्ये सर्वाधिक अस्थिरता
राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानतंर शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, आमच्या पक्षात कुठेही अस्थिरता नाही. भाजपा आमदारांमध्ये सर्वाधिक अस्थिरता आहे. कारण ते मूळचे भाजपाचे लोक आहेत. भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि जिंकले. परंतु, त्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. बाहेरचे लोक आले आणि सर्वात आधी पंगतीला बसले. त्यामुळे भाजपा आमदारांमध्ये नाराजी आहे. वेगवेगळी अमिषे दाखवून ज्या आमदारांना त्यांनी तिकडे नेले आहे, त्यापैकी बहुतेकजण नाराज आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही अदृष्य शक्तींचा वापर करून हे सगळे केले गेले आहे, हे सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातीला जतनेला सगळे काही माहिती आहे. शिवसेनेच्या बाबतीत जे काही झाले, तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत जे झाले. जनतेला याची कल्पना आहे. महाराष्ट्रातील जनता हे सगळे घडवणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका करण्यात आली.