NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar:अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत पक्षात मोठी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थ खात्याचा कार्यभारही अजित पवारांकडे देण्यात आला. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला असून, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच निकाल देण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, यात महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभी फूट लक्षात घेता पक्षातील गळती थांबविण्यासाठी शरद पवार गटाने सर्वस्व पणाला लावले आहे. त्यासाठी आता मुंबईसह राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यासाठी पक्षाची धावपळ सुरू झाली आहे. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत ही प्रतिज्ञापत्रे लवकरात लवकर भरण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी
या बैठकीत रोहिणी खडसे यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि निरीक्षक यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत या प्रतिज्ञापत्रासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याशिवाय आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रात नेमके काय?
या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, आणि निरीक्षकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना इंडिया आघाडी संदर्भात माहिती दिली. त्याशिवाय या प्रतिज्ञापत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशावर आणि तत्त्वांवर बिनशर्त निष्ठा ठेवतो. तर जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून यांच्या नेतृत्वाला माझा मनापासून, बिनशर्त आणि अटळ पाठिंबा असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. बीड जिल्ह्यातील बबन गित्ते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सुशिला बोराडे यांची महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चांदपीर इनामदार यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.