NCP Sharad Pawar ( Marathi News ) :लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते दाखल झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी १२ जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजते.
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार महायुतीत सामील झाले असले तरी शरद पवार गट मात्र महाविकास आघाडीतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पक्षाची जिथे ताकद आहे अशा जवळपास १२ जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याला मिळाव्यात यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
कोणत्या जागांसाठी पवार गट आग्रही?
राष्ट्रवादी शरद पवार गटाने मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सातारा, बारामती, शिरूर, रायगड या चार जागांसह इतर आणखी आठ जागांवर दावा सांगितल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माढा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, दिंडोरी आणि अहमदनगर या जागा, तसेच मराठवाड्यातील बीड, विदर्भातील अमरावती आणि मुंबईजवळच्या भिवंडी मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार कलगीतुरा रंगत आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला २३ जागांची मागणी केल्यानंतर काँग्रेसकडून माजी खासदार संजय निरुपम यांनी राऊतांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीकडूनही १२ जागांबाबत आग्रह धरण्यात आल्याची माहिती समोर आल्याने जागावाटपाचा हा तिढा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कसा सोडवला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.