Jitendra Awhad News: एकीकडे राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने देशवासीयांमध्ये आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपाने ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले, तर अजित पवार गटाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर पलटवार केला आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यानंतर भाजपा, अजित पवार गट आक्रमक झाले आणि आव्हाडांवर टीकेचे बाण सोडले.
अजित पवार गटाची जितेंद्र आव्हाडांवर टीका
प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे अकलेचे तारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडलेत पण ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही. असे असताना सातत्याने जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवदेवतांविरुद्ध, सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलतात आणि धर्माचा अपमान करतात. प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल, जितेंद्र आव्हाड यांच्यावर येत्या २४ तासात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस ठाण्यातच महाआरती करु, असा इशारा अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी दिला. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.
इथे काकाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले, पण...
माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामाचा इतिहास माहित नसलेल्यांना इतिहास समजून सांगावा लागेल. श्रीरामाने वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की , त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरले होते, त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्षे वनवास भोगला. पण, सम्राट भरत यांनी श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला. इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. यांचा प्लॅन हाणून पाडू आम्ही! तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्रीराम आईवडिलांना मानायचे. तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवताहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.