NCP Sharad Pawar Group Rohit Pawar News: राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. तसेच अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. त्यावरूनही राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेते भाजपमध्ये जातील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीतील भेट सदिच्छा भेट असू शकते. किंवा ठरल्याप्रमाणे भाजप काम करत नाही. यासह अनेक विषय असावेत. त्यामुळे १०० टक्के नाराजी आहे. फक्त नेत्यांमध्येच नाराजी नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. मला आणि लोकांना असे वाटते की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिंदे-पवार गटातील काही नेते थेट भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली.
शिंदे आणि अजित पवार गटातील लोकांना लोकसभेपुरतेच वापरले जाईल
शिंदे आणि अजित पवार गटातील लोकांना लोकसभेपुरतेच वापरले जाईल. त्यांचे महत्त्व न राहिल्यानंतर सोडून दिले जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. सुरुवातीला नेत्यांना आणि सामान्य नागरिकांना आमिषे दाखवायची, परंतु जेव्हा प्रत्यक्षात आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा काही करायचे नाही, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, शरद पवार यांचा ओबीसी दाखला असलेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर, भाजप असत्याच्या मार्गाने जात आहे. त्यांच्या सोशल मीडियाची टीम काही खोट्या गोष्टी पसरवत असते. हा दाखला स्प्रेड केला जातोय हा त्याचाच भाग आहे. सध्या जो दाखला व्हायरल होतोय त्यात कोणतेही सत्य नाही. अशा गोष्टी करणाऱ्या कार्यकर्ते आणि भाजपा नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.