Supriya Sule News: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठा समाजाने जल्लोष केला. तर दुसरीकडे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्यावर कॅबिनेटमध्ये अन्याय होत असल्याची टीका केली आहे.
मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आमचे सरकार आल्यास लगेच आम्ही तसे निर्णय घेऊ. आता केंद्रात आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे, या दोन्ही सरकारने मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाची मागणी केली, तर राजकीय विरोधक असलो तरी पूर्ण सहकार्य करू आणि त्यांच्या बाजूने मतदान करू, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राज्याचे मंत्रिमंडळ छगन भुजबळ यांचे ऐकत नाही, हे दुर्दैव
छगन भुजबळ यांचा हा अपमान आहे. इतक्या ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे त्यांच्याच कॅबिनेटमध्ये ऐकले जात नाही. अनेकदा संजय राऊत जे सांगतात, ते अनेकांना आवडत नाही. परंतु, संजय राऊत म्हणतात की एक गँगवॉर सुरू आहे. आमचे ज्येष्ठ नेते ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम, आदर, विश्वास आहे, माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, अशा माननीय आदरणीय छगन भुजबळ यांच्यावर हा अन्याय होत असेल, तर हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांचे अंतर्गत काय आहे, ते मला माहिती नाही. छगन भुजबळ यांना सातत्याने ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये मांडता येत नाहीत, त्या त्यांना कॅमेरासमोर येऊन मांडाव्या लागतात. यातच या ट्रिपल इंजिन खोके सरकारचे अपयश आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, मराठा समाजाल वेगळ आरक्षण द्या ही माझीही मागणी आहे. पण आता कुणबी नोंदी सापडल्या या नावाखाली सर्व मराठ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्या असे सुरु आहे. सरकार आधी वेगळ आरक्षण आम्ही देणार म्हणत होतं. तर आता मराठा समाज अप्रगत आहे हे सिद्ध करणारा अहवाल तयार करत आहे, तर मग मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याचे कारण काय, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली.