Supriya Sule Reaction on Nitish Kumar Resign: सरकारच्या सर्व कामांचे श्रेय ते घेत होते. मीही काम करत होतो, पण मला काम करू दिले जात नव्हते, दोन्ही बाजूंनी त्रास होता. महाआघाडीशी फारकत घेण्याबाबत चारही बाजूंनी सल्ले मिळत होते, त्यानुसार राजीनामा दिला आणि विद्यमान सरकार विसर्जित केले, असे सांगत नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर आता नितीश कुमार भाजपाच्या पाठिंब्यावर नवे सरकार स्थापन करतील, असा कयास आहे.
नितीश कुमार यांचा निर्णय इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितीश कुमार यांनीच इंडिया आघाडीची मोट बांधली होती. इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारमध्येच झाली होती. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठी नितीश कुमारांचा विचार सुरू होता. ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या निर्णयानंतर नितीश कुमारांनीही इंडिया आघाडीला रामराम केल्याने इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही जाहीर निषेध करतो
इंडिया आघाडीत प्रत्येकजण आपआपल्यापरिने काम करत आहे. ही आमची वैयक्तिक लढाई नसून वैचारिक लढाई आहे. दिल्लीत दडपशाही होत आहे, यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता फोडणे, घरे फोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. या दडपशाहीविरोधात आमची लढाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
दरम्यान, देशातील काही मोजक्याच नेत्यांपैकी नितीश कुमार असे एक नेते आहेत, ज्यांनी राजकीय कारकीर्दीत आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु, या आठ कार्यकाळांमध्ये भाजपा, राजद असे वेगवेगळे सहकारी सत्तेत होते. सतत वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी करणे, युती करून सत्तेत बसण्याच्या नितीश कुमार यांच्या या धोरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने ‘पलटू कुमार’, ‘पलटू राम’ अशी खोचक टीका केली जाते.