शरद पवार गटातील आमदार-खासदार अजितदादांच्या गळाला? समर्थन पत्रही दिले! तर्क-वितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:54 AM2023-09-22T11:54:01+5:302023-09-22T11:59:09+5:30
Sharad Pawar Group And Ajit Pawar Group: अजित पवार गटाला पाठिंबा देणारे शरद पवार गटातील दोन बडे नेते कोण? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
Sharad Pawar Group And Ajit Pawar Group:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांनी आपापले म्हणणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडले असून, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुनावणी होणार आहे. यातच शरद पवार गटातील एक आमदार आणि एक खासदार अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा असून, या दोन बड्या नेत्यांनी अजित पवार गटाला समर्थनपत्रही दिल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यानंतर आमदार, खासदार, नेते मंडळींना वळवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शरद पवार गटाकडील दोन बडे नेते अजित पवार गटात जाणार असून, या दोन्ही नेत्यांनी अजित पवार गटाला समर्थन पत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.
अजित पवार गटाला समर्थन देणार आमदार-खासदार कोण?
राष्ट्रवादीतील या आमदार आणि खासदाराने अजित पवार गटाला समर्थन देत असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. अजितदादांना समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांना लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील यांचा पाठिंबा आहे. तर राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान या शरद पवार गटात आहेत. या चार खासदारांपैकी समर्थन देणारा तो खासदार कोण? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पार पडलेल्या शपथविधीवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटाकडे आले.
दरम्यान, अजित पवार गटात जाणारे आमदार-खासदार कोण, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अजित पवार गटाला समर्थन करणारा हा खासदार आणि आमदार शरद पवार गटामध्ये असला तरी योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचे सांगत अजित पवार गटाने ही मागणी केली आहे.