Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. याप्रकरणी चार जणांना पकडण्यात आले असून, चौकशीदरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावर भाष्य करण्यात आले आहे.
नहीं चलेगी नहीं चलेगी.. तानाशाही नहीं चलेगी... अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून आले. सन २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. या घटनेला २२ वर्ष झाली असून, यानिमित्ताने शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. याच दिवशी सुरक्षेत एवढी मोठी चूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली असून, केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची कशी ठेवणार
देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आज घडलेल्या घटनेतून गांभीर्याने लक्षात आले. प्रेक्षक गॅलरीतून २ अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून एकच गोंधळ उडवला, ज्यामुळे लोकसभा सदस्यांना त्याचा त्रास भोगावा लागला. देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा त्रुटी असणे म्हणजे केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांची देशाच्या सुरक्षिततेबाबत असणारी गांभीर्यता यातून लक्षात येते आणि पुन्हा सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते, सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे, त्यामुळे केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच अपेक्षा..! अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसने एक्सवर शेअर केली आहे.
दरम्यान, संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असतांना आजच्याच दिवशी लोकसभेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सभागृहात उडी मारली. ही घटना संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा व्यवस्थेचे हे अपयश आहे. संसदेची सरक्षा व्यवस्था कशी कोलमडली आहे? याचे हे द्योतक आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी. जर संसदच सुरक्षित नसेल तर मग इतरत्र काय? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.