NCP Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ अजित पवार गटाला बहाल करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या शरद पवार गटाच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले. या निर्णयानंतर अजित पवार गटाने एक्सवर केलेल्या एका पोस्टवरून शरद पवार गटाने चांगलाच हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही, असा पलटवार शरद पवार गटाने केला आहे.
शरद पवार गटाने अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अजित पवार गटाला चांगलेच सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणे हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही…! असो, पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो!, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.
अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की...
सर्वोच्च न्यायालयाने विशेष याचिकेवर सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांव्दारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत, घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!, असे नमूद करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!, असे नमूद करावे. असा खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे. खरी माहिती लपवून खोटे सांगण्याचा खटाटोप
परंतु आपण खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. खरी माहिती लपवून खोटे सांगत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर घातलेल्या अटी व शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर, निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईलाही सामोरे जा म्हणजे झाले, असे शरद पवार गटाने म्हटले आहे.
दरम्यान, आणि हो... गेल्यावेळेसच्या ट्वीटप्रमाणे हेदेखील ट्वीट डिलीट करू नका... त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा, असे शरद पवार गटाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत अजित पवार गटाने एक्सवर शेअर केलेला एक फोटो शेअर केला आहे.