Baramati Lok Sabha Election 2024 News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार, बैठका, सभा यांना वेग आला असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे. यामुळे आता या चिन्हावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत ५१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी २० एप्रिल रोजी झाली. छाननीमध्ये पाच अर्ज बाद होऊन ४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यापैकी आठ जणांनी अर्ज माघारी घेतला, तर दोन जणांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
सदर वाटपास आमची हरकत आहे
३५ बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांचे चिन्ह वाटपाबाबत आपण बैठक बोलवली होती. सदर बैठकीमधे आपण आम्हास आमच्या पक्षाकरिता राखीव असलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) याचे वाटप आम्हास केले. परंतु अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना अपक्ष उमेदवार करिता चिन्ह तुतारी असे वाटप केले आहे. सदर वाटपास आमची हरकत आहे. दोन्ही चिन्हाचे नावामधे साधर्म्य असल्याने चिन्ह तुतारी फुंकणार माणूस व तुतारी हे नाव सारखे आहे. राज्यपक्ष म्हणून आम्हास वाटप केलेले चिन्ह (तुतारी फुंकणार माणूस) या नावात तुतारी या नावात साम्य असल्याने मतदार यांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून त्या ठिकाणी दुसरा शब्द निवडणूक आयोगाकडून देण्यात यावा ही विनंती, अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, या मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. उमेदवारांची संख्या निश्चित झाल्याने अपक्ष उमेदवारांना मतदानासाठी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये शेख यांनी पसंतीमध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह शेख यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे आहे. त्यामुळे शेख यांना देण्यात आलेल्या चिन्हावर शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आणि पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या शेख यांनी मुक्त चिन्हांसाठी असलेल्या चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. पसंतीक्रमानुसार त्यांचा पहिला पसंतीक्रम तुतारी होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार शेख यांना हे चिन्ह देण्यात आले.