लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव दिलं आहे. तसेच या शपथनाम्यामधून शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, गरीब अशा समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचे शरद पवार गटाने म्हटलं आहे. सध्या गाजत असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नासह, जातिनिहाय जनगणाना, महिलांना आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तरुणांना पदवीनंतर एक वर्ष आर्थिक मदत, जीएसटीमध्ये सुधारणा, ५०० रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलवरील कराबाबत फेरविचार, अशी अनेक आश्वासने या शपथनाम्यामधून देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या शपथनाम्यामध्ये जातिनिहाय जनगणना करण्याचे तसेच आरक्षणाची सध्याची असलेली ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आणि विधिमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शपथनाम्यातून देण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना हमिभाव मिळवून देण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी एका आयोगाची निर्मिती करण्याचं, तसेच शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी न आकारण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. मागच्या काही काळात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्याचं, तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील करांचा पुनर्विचार करण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आलेलं आहे.
बेरोजगारीच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांमधील कंत्राती भरती बंद करण्याचं तसेच पदवी मिळाल्यानंतर एक वर्षापर्यंत तरुणांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यामधून देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवणार- जातिनिहाय जनगणना करणार- सरकारी नोकरीत महिलांना ५० टक्के आरक्षण-पदवीधरांना एक वर्ष आर्थिक मदत- शेतकऱ्यांना हमिभाव आणि कर्जमाफीसाठी आयोग- सिलेंडर ५०० रुपयांत देण्याचा विचार- ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना- शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही- महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदा करणार