करेक्ट कार्यक्रम होणार, BJPलाच खिंडार पडणार? NCP फुटीनंतर शरद पवार इन अॅक्शन मोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 06:43 PM2023-07-27T18:43:17+5:302023-07-27T18:58:20+5:30
NCP Sharad Pawar Vs BJP: अजित पवार गट आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी विशेष रणनीति तयार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
NCP Sharad Pawar Vs BJP: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी बंडखोरी करत थेट सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. यानंतर आता शरद पवार इन अॅक्शन मोडवर आले असून, पक्ष बांधणीवर भर दिला जात आहे. शरद पवार यांनी काही प्लॅन आखले असून, यामुळे कदाचित भाजपलाच खिंडार पडू शकते, असा कयास बांधला जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. यानंतर आता शरद पवारांनी पुन्हा ताकदीने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, राज्यभर दौरेही सुरू केले आहेत. अजित पवार गटाला आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी तयारीला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत राहील, यावर भर देणार
शरद पवार हे पक्ष बांधणीवर भर देणार आहेत. राज्यातील महत्त्वाचे जिल्हे आणि तालुक्यात शरद पवार यांच्या सभा होऊ शकतात. या भागातील जनतेशी संवाद साधला जाणार असून, ज्या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्या भागात सर्वाधिक फोकस केला जाईल. नेते गेले तरी कार्यकर्ते आणि जनता आपल्यासोबत राहील, यावर सगळा भर असेल, असे सांगितले जात आहे.
पर्यायी नेतृत्व निर्माण करणार
राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या आमदारांनी सोडचिठ्ठी दिली त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व उभे केले जाणार आहे. पक्षातील माजी आमदारांना पुन्हा सक्रिय केले जाणार आहे. त्यांना बळ दिले जाणार आहे. कदाचित त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. तसेच भाजपमधील ज्या माजी आमदारांना अडगळीत टाकण्यात आलेय, त्यांना आपल्यासोबत घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भाजपने माजी आमदारांकडे दुर्लक्ष केले आहे. या आमदारांना राजकारणात कमबॅक करायचा आहे. पण भाजपकडे इतर पक्षांच्या नेत्यांचा ओघ वाढल्याने त्यांना कमबॅक करता येत नाहीये. त्यामुळे या नाराज आणि अस्वस्थ आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केले जाऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. माजी आमदारांना फोडण्यात शरद पवार यांना यश आल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना पुढे कसा प्रतिसाद मिळतो, भाजपला खिंडार पडू शकेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे म्हटले जात आहे.