NCP Sharad Pawar : "अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही, पक्षात निर्णय..," जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 03:24 PM2023-06-10T15:24:28+5:302023-06-10T15:25:09+5:30
प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही घोषणा पवारांनी अजित पवार व्यासपीठावर असतानाच करण्यात आलीय. कार्यक्रमानंतर अजित पवारदेखील माध्यमांशी न बोलता तातडीनं निघून गेले. दरम्यान, यावर राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं.
"नव्या जबाबदारीसह नवी टीम काम करण्यास तयार आहे. आम्ही सर्व एकसंघ आहोत. अजित पवार महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना आणखी राज्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, अन्य लोकांनाही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पक्षाचा विस्तार, व्यवस्था यासाठी काय करावं लागेल हे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय," असं जयंत पाटील म्हणाले.
"महाराष्ट्रात अजित पवार आणि आम्ही पक्ष वाढवण्याचंच काम करत आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. परंतु अन्य राज्यांमध्ये ती कमी आहे. जी जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आलीये, ते निरनिराळ्या राज्यात जाऊन पक्षाचा विस्तार करण्याचं काम करतील," असंही त्यांनी सष्ट केलं. "जेव्हा बैठक संपली त्यानंतर त्या ठिकाणाहून उठायलाच हवं ना. सर्व जण उठल्यानंतर ते त्या ठिकाणी बसून राहतील असं अपेक्षा करता का? अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही. जे काही निर्णय घेतले जातात ते विचारपूर्वकच घेतले जातात," असंही ते म्हणाले.
कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती
राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतु आता त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.