Sharad Pawar News: जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, राज्यभरातून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा बेछूट लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका व्यक्त केली जात असताना सत्ताधाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडेबोल सुनावलेत.
जालन्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. २०१४ लाही युतीचे सरकार सत्तेत होते. आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाने अनेक आंदोलने केली. या आंदोलनांवेळी कधीच बळाचा वापर केला नाही. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत. त्यांची क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले.
देवेंद्र फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच
जळगाव दौऱ्यावर असलेले शरद पवार मीडियाशी बोलत होते. जालन्यातील घडामोडींवर बोलताना, मला इतके माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथे पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसते. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणे म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणे आहे, या शब्दांत शरद पवारांनी निशाणा साधला.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजतही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत. त्यामुळे आरक्षण दिले जावे, अशी मागणी होत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.