कोल्हापूर: राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आरोपांची आतषबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत अनेकांवर जोरदार निशाणा साधला. यानंतर शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बरेच महिने हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कुणाला अंदाज येत नव्हता. त्यांचे हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहिती नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशात झालं ते उद्धव ठाकरे महाराष्ट्रात होऊ देणार नाही
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील विकासाचे कौतुक केले, यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. आता उत्तर प्रदेशात कौतुकासारखे त्यांना काय दिसले हे मला माहिती नाही. उत्तर प्रदेशात अलीकडच्या काळात काय काय घडले? निवडणुकीचा निकाल वेगळा लागला त्याची कारणे दुसरी आहेत. पण त्या ठिकाणी लखीमपूरला शेतकऱ्यांची हत्या झाली, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास वर्षभर शेतकरी बसले होते, त्या सगळ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला. कोणी पुढे आले नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की, ज्या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत, योगींच्या राजवटीच्या काळात आणि अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे असे जर राज ठाकरे म्हणत असतील, तर मला काही त्यावर भाष्य करायचे नाही. पण महाराष्ट्रात असे कधी उद्धव ठाकरेंचे सरकार होऊ देणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.