Maharashtra Politics: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरून अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपचा ३० वर्षांचा गड उद्ध्वस्त करणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. यातच रवींद्र धंगेकर विजयी होईल, याची खात्री नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र धंगेकरांचा विजय हा वैयक्तिक होता, असे म्हटले. हरकत नाही. या उमेदवाराला तिकीट देण्यात आमचे व्हिजन होते, हे तर त्यांनी मान्य केले. रवींद्र धंगेकर यांनी मागील तीस वर्षे जे काम केले त्याला लोकांनी मते दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.
कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती
कसब्यात यश मिळेल असे सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होते. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. हे मुख्य कारण आहे. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले होते. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचे लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असे वाटत होते. पण या उमेदवाराचे काम परिणामकारक ठरले. हा उमेदवार कधीच चारचाकीत बसत नाही. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे दोन पायांवर चालणाऱ्यांनी यांना मते दिली, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथील सभेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, असा दावा करण्यात आला आहे. यावर बोलताना, उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच भूमिका माडंतायत आणि या तीन पक्षांची ताकद कालच्या सभेत दिसली, असे शरद पवार यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"