मुंबई - लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार Sharad Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. शरद पवारांनी पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी समितीची नेमणूक केली होती. मात्र शरद पवारांनी राजीनामा देऊ नये अशी आक्रमक भूमिका नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानंतर आज पवारांनी निवडलेल्या समितीची बैठक झाली.
या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर समिती आता त्यांचा निर्णय शरद पवारांना कळवणार आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेल्या ३ दिवसांपासून हे आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ सुरू आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आज सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. यावेळी भिवंडी येथील राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाने अंगावर पेट्रॉल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांनी वेळीच सतर्कता दाखवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अजितदादा येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार याच बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले. अजित पवार पक्ष कार्यालयाच्या परिसरात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. 'देश का नेता कैसा हो...शरद पवार जैसा हो...', अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी कोणतीही रिअॅक्शन न देता पक्षाच्या कार्यालयात निघून गेले.